पॅरिस : आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे.
‘युनेस्को’च्या २०२४-२५ या वर्षीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी भारत सरकारने ‘भारतातील मराठा साम्राज्यातील किल्ले’ या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित या किल्ल्यांची शिफारस केली होती. भारतीय शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये ‘युनेस्को’च्या समितीसमोर सादरीकरण करताना या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा पटवून दिला. त्यानंतर समितीने ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून या किल्ल्यांना मान्यता दिली.
भारत सरकारने महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांबरोबरच तमिळनाडूमधील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची शिफारस ‘युनेस्को’कडे केली होती. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. स्वराज्यातील प्रशासकीय केंद्रे म्हणून काम करण्याबरोबरच शत्रूसैन्यावर वचक ठेवण्याचे कामही या किल्ल्यांनी केले होते. द्रष्टा राज्यकर्ता म्हणून जगभरात गौरविल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी आणि रक्षण केले होते. या किल्ल्यांची धास्ती इंग्रजांच्या काळापर्यंत टिकून होती.
या किल्ल्यांची रचना, त्याची तटबांधणी, त्यावरील लष्करी व्यवस्था याची मांडणी ‘युनेस्को’ समोर करण्यात आली. त्याचे कागदोपत्री असलेले पुरावेही सादर करण्यात आले. याची दखल घेत ‘युनेस्को’ने जागतिक वारसा यादीत या स्थळांचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे या किल्ल्यांची ख्याती आणि महत्त्व जगभरात पोहोचणार असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासही मदत होणार आहे. राज्याच्या पर्यटनातही यामुळे मोलाची भर पडणार आहे.
‘स्पर्श तुझ्या पायांचा हो, अन् पेटूनि उठली माती’ असा छत्रपती शिवरायांबद्दल सार्थ अभिमान, आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या कवितेच्या या ओळींप्रमाणेच महाराजांचे गडवैभव आजही लोकांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे, या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश केल्याने किल्ल्यांचे नव्हे, तर या किल्ल्यांमुळे जागतिक वारसा यादीचे महत्त्व वाढल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
मोठी अडचण दूर
वारसा स्थळासाठी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर ‘युनेस्को’च्या सल्लागार मंडळाने (आयसीओएमओएस) ‘दस्तऐवजीकरण नसणे, व्यवस्थापनातील त्रुटी’ अशी कारणे सांगत भारताचा अर्ज नाकारावा, अशी शिफारस ‘युनेस्को’कडे केली होती. राज्यातील विस्तृत भूप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हे बारा किल्ले एकसंध संरक्षण व्यवस्था म्हणून कसे महत्त्वाचे होते, हे पटवून देण्यातही भारताला अपयश आल्याचे सल्लागार मंडळाने त्यांच्या अहवालात म्हटले होते. जागतिक वारसा समितीच्या आज झालेल्या ४७ व्या सत्रात सर्व नामांकनांवर अंतिम विचार करण्यात आला. ‘युनेस्को’मधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने सल्लागार मंडळाच्या शिफारसींना आव्हान देतानाच त्यातील तांत्रिक त्रुटीही दाखवून दिल्या. यानंतर समितीने भारताचा अर्ज मान्य करत किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यास मंजुरी दिली.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यांत दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे. देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
समृद्ध वारसा
रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 12/Jul/2025














