लांजा : सालपे-शिपोशीत रस्त्यावर गव्याचा मुक्त संचार

लांजा : लांजा तालुक्यातील सालपे शिपोशी फाटा येथे दाभोळे कोर्ले-वाटूळ मार्गावर भरदिवसा रस्त्यावर गवा मुक्तपणे संचार करताना निदर्शनास आला. रस्त्याने वावरणाऱ्या या गव्याला पाहताच नागरिकांची त्रेधातिरपिटी उडाली. सालपे फाटा येथे बस थांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या नागरिकांनी तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये गव्याला कॅमेऱ्यात कैद केले.

सध्या पावसाळा सुरू झाला आहे भात शेती लावण्यात आली आहे. हिरव्या चाऱ्याच्या शोधार्थ वन्यजीव शेतकऱ्यांच्या शेतात येऊन उभ्या पिकाची नासधूस करु लागले आहेत. दववर्षी लांजा तालुक्यात अनेकवेळा गवे, डुकरे, बिबट्या, साळंदर, रानडुक्कर, भेकर, ससा, कोळसुंदा, खवलेमांजर, शेकरू असे विविध प्रजातीचे प्राण्याचा मानवी वस्तीकडे वावर सुरू झाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यांमधून गवा अन्नाच्या भटकंतीसाठी लोकवस्ती शिरले आहेत. अनेक वेळा गवारेडे एकत्र कळपाने फिरताना दिसून येत आहेत.

लांजा तालुक्यातील कोचरी, सालपे, शिपोशी, पालू, हर्दखळे, खेरवसे, वाडगाव, हसोळ, तळवडे, कुर्ने, बापेरे, सोळवशी, साटवली, रूण, पुनस, वेरळ, कणगवली, कुरचुंब या गावातील घनदाट जंगलंय भागामध्ये गवा राजरोसपणे फिरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी शिपोशी फाटा येथे आढळून आलेला गवा चक्क रस्त्याने बिंदास्तपणे वावरताना दिसून आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 12/Jul/2025