लांजा : माचाळ येथे कचरा पेट्यांसह, सूचना फलक, दिशादर्शक

लांजा : तालुक्यातील माचाळ गावामध्ये पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पालु माचाळचे उपसरपंच सागर गाडे यांच्या संकल्पनेतून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माचाळ येथे कचरा पेट्या व सूचना फलक दिशादर्शक लावण्यात आले आहेत. सूचना फलक व कचरा पेट्यांचा येणाऱ्या पर्यटकांनी उपयोग करावा व माचाळ परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळा सुरू असल्याने वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी तालुक्यासह जिल्हा, परजिल्ह्यातून पर्यटक माचाळ गावात दाखल होत आहेत. पावसाळ्यात येथील अल्हाददायक निसर्ग सौंदर्य पर्यटकाना आकर्षित करत आहे. सद्या माचाळकडे पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने पर्यटकांसाठी ग्रामपंचायतीने सूचना फलक, ठिकाण दिशा दर्शक लावले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर कड्यांवरून फेरफटका मारताना स्वतःची काळजी घेऊन पर्यटकांनी आनंद घेऊन सूचनांचे पालन करावे.

माचाळ पर्यटनस्थळी मुचकुंदी मंदिर, मुचकुंदी नदीचे उगमस्थान, उलटा धबधबा, माचाळ प्रवेश या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. पालू-माचाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर गाडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक केले जाते आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर