रत्नागिरी : गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. रत्नागिरीतही २ मेपासून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत २३ रुग्णांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी १७ रुग्णांना १४ लाख ५० हजार रुपयांची मदत या कक्षाने मिळवून दिली आहे.
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तहसीलदार कार्यालय इमारतीत प्रथम मजल्यावर मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय सहायता कक्षांतर्गत जिल्हा समन्वय कक्ष सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत आहे. या कक्षाची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी जिज्ञा लघाटे, समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) अनिता पवार आणि लिपिक अमित कोरगावकर, राजेश आंबेकर सांभाळत आहेत. रुग्णांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. वार्षिक १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो.
२ मेपासून हा कक्ष सुरू झाल्यानंतर या कक्षात माहिती घेण्यासाठी ७३ नागरिकांनी संपर्क केला आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनिधी या कक्षाला भेट देऊन माहिती घेत आहेत. तसेच सहायता मिळालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करण्यात येत आहे. कक्ष स्थापन झाल्यापासून गेल्या सव्वा महिन्यात २३ रुग्णांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. या योजनेअंतर्गत या कक्षाने १२ रुग्णांना १ लाख आणि ५ रुग्णांना ५० हजार रूपयांची मदत अशी एकूण १७ रुग्णांना मिळून एकूण १४ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळूवन दिली आहे.
कक्षात विविध योजनांची माहिती
या कक्षात मुख्यमंत्री सहायता योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये, अन्य शासकीय योजना याविषयी गरजूंना माहिती दिली जाते.
गावपातळीवर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने कॅन्सर डायग्नोसिस कॅम्प घेण्यात आले. तसेच जिल्ह्यात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आयोजित करण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 12/Jul/2025














