रत्नागिरी : जिल्ह्यात तब्बल एक लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर

रत्नागिरी : विजेची बिले थकविणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसविण्यासाठी महावितरणने स्मार्टमीटर आणले असून, ते बसविण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ग्राहकांचे एकूण सहा लाख २२ हजार ९५५ वीज मीटर आहेत. त्यापैकी आतापर्यंत एक लाख १८ हजार ८२० ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. केंद्र शासनाने देशभरात सर्वत्र जुने मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विद्युत कंपन्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

केंद्र सरकारची प्रीपेड स्मार्ट मीटर योजना महाराष्ट्रातही लागू करण्यात आली आहे. वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना हे मीटर रिचार्ज करणे आवश्यक आहे. जेवढे रिचार्ज तेवढीच वीज वापरता येणार आहे. सध्या महावितरणकडून फिडर, उपकेंद्र, शासकीय कार्यालये, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा लाख २२ हजार ९५५ वीज मीटरपैकी आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण एक लाख १८ हजार ८२० स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व प्रकारच्या ग्राहकांचे जुनी मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. ग्राहक तसेच वीज कर्मचारी संघटनांकडून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असला तरी ग्राहकांच्या माथ्यावर ही योजना लादली जाणारच आहे.

काय आहे स्मार्ट मीटर
स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईल रिचार्जप्रमाणे रिचार्ज करावे लागणार आहेत. ते रिचार्ज असतील तरच वीज पुरवठा सुरू राहील. ग्राहक जितके पैसे भरतील तेवढीच वीज वापरता येणार आहे. विजेचा किती वापर झाला आहे, याची माहिती ग्राहकांना मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. पैसे भरले तरच वीजपुरवठा सुरू होईल, अशी सुविधा प्रीपेड मीटरमध्ये उपलब्ध आहे.

वीज वापरावर मर्यादा
स्मार्ट मीटरसाठी मोबाईलप्रमाणे ग्राहकांना कुठूनही रिजार्च करता येणार आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा ग्राहकांना उपलब्ध होईल. अखंडित वीज पुरवठ्यामुळे वापर कमी अधिक करता येणार आहे. रिचार्ज संपले की, वीजपुरवठा आपोआप खंडित होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 12/Jul/2025