रत्नागिरी : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांबाबत प्रत्येक मराठी मनाला आस्था असतेच. त्या काळी कोणतीही सुविधा नसताना महाराजांनी केलेलं किल्ल्यांचं काम पाहून प्रत्येकजण प्रफुल्लित होऊन जातो. किल्ल्यांविषयी ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही उत्सुकता कळंबस्ते मलदेवाडी (ता. संगमेश्वर) येथील गिर्यारोहक अल्पेश सोलकरने महाराष्ट्रातील १०० गडकिल्ल्यांची भटकंती करत पूर्ण केली.
अल्पेश कृष्णा सोलकस्चे शिक्षण बी. कॉमपर्यंत झाले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी सांभाळून भटकंतीसाठी सहकारी, गिर्यारोहक तयार केले. भटकंतीसाठी त्याच्यासोबत सहकारी असतात. गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे, निसर्गाच्या सानिध्यात जावे, तेथील इतिहास-भूगोल अभ्यासावा, हाच उद्देश या भटकंतीमध्ये असल्याचे अल्पेश सांगितले. नोकरीसोबतच भटकंती करता येईल, असे त्याने नियोजन आखले. पुढील करिअर याच क्षेत्राशी निगडित असावे, म्हणून संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ) संस्था स्थापन केली. याच संस्थेमार्फत शैक्षणिक विभागांतर्गत विविध शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप, तालुकास्तरीय स्पर्धा, दुर्गम भागात, डोंगरदऱ्या, वाडीवस्तीतील शाळांना भेटी, त्यांना उपयुक्त वस्तूवाटप तसेच रक्तदान शिबिर, गडकिल्ले वृक्षारोपण उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्राचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर गडकिल्ल्यावर गेलेच पाहिजे. त्याबाबत जनजागृती करण्याचे काम अल्पेश सोलकर करत आहे.
गडकिल्ले नावारूपाला यावेत यासाठी प्रयत्न
बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये मैदानी खेळ किंवा भटकंतीत फारसा रस नसल्यासारखे दिसून येते; पण जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा शारीरिक क्षमतेचा कस समजतो. नकळत दुर्मीळ वस्ती, तेथील माणसे, त्याचे राहणीमान, निसर्गाचा अभ्यास होतो. हे सगळं भटकंतीमध्ये अनुभवायचे असेल, तर त्याला ट्रेकिंगशिवाय पर्याय नाही. गावाकडचे किल्ले नावारूपाला यावेत, तिकडे अधिक सोयीसुविधा व्हाव्यात, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गिर्यारोहक सोलकर याने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 16/Oct/2024











