रत्नागिरी : कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी आमदार डॉ. एम. जी. मुळे यांनी रत्नागिरीतील शिवसृष्टीला भेट देऊन येथील कामाचे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. शिवसृष्टी पाहून ते अत्यंत समाधानी झाले.
गेल्या काही काळापासून रत्नागिरीतील शिवसृष्टीची ख्याती ऐकून डॉ. मुळे यांनी विशेषतः रत्नागिरी दौरा आखला होता. रत्नागिरीतील शिवसृष्टीची पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान त्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला.
कर्नाटकात छत्रपती शहाजी महाराज यांचे समाधी स्थळ आणि शिवसृष्टी उभारणीसाठी डॉ. एम. जी. मुळे प्रयत्नशील आहेत. याच संदर्भात त्यांनी मंत्री सामंत यांच्याकडे कर्नाटक मधील छत्रपती शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि शिवसृष्टीच्या कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावर मंत्री सामंत यांनी त्यांना आश्वासन दिले की, या कामांसाठी मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक आयोजित करून त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
डॉ. एम. जी. मुळे यांनी रत्नागिरी येथील शिवसृष्टीच्या संपूर्ण कामाची बारकाईने पाहणी केली आणि ठेकेदार वीरेंद्र वणजु यांच्याकडूनही या कामाबद्दल सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या या भेटीमुळे रत्नागिरीतील शिवसृष्टीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.











