खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटात काल (१३ जुलै) सकाळच्या सुमारास ट्रक अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जात असलेला ट्रक (क्र. एमएच ०१ इ डब्ल्यू ०६७५) घाटात उतरत असताना तोल जाऊन रस्त्याच्या बाजूला उलटला. या अपघातात ट्रक चालकासह एकूण दोनजण जखमी झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. ट्रक उलटून चालक त्यामध्ये अडकून पडल्याने बचावकार्य आव्हानात्मक होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने दुसऱ्या ट्रकला बांधून अपघातग्रस्त ट्रक सरळ करण्यात आला. त्यानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात अमन आरिफ शेख (१४) आणि चालक मोहम्मद शाकीर अब्दुल हमीद शेख (२३, रा. शांतीनगर, भिवंडी) हे दोघे जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचावकार्यात विनायक कदम आणि अक्षय भोसले यांचेही मोलाचे योगदान लाभले. मदत ग्रुपच्या तत्परतेमुळे संभाव्य जीवितहानी टळली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 14/Jul/2025














