दापोली आगाराकडून संगणकीय आरक्षण

दापोली : गणेशोत्सव सण दीड महिन्याभरावर आल्याने चाकरमान्यांची गावाकडे येण्यासाठी गाड्यांचे आरक्षण करण्याची धावपळ सुरू आहे. गणपती सणासाठी गावी आलेला चाकरमानी हा पहिली पसंती एसटी सेवेला देतो. या चाकरमानी मंडळींच्या परतीच्या प्रवासासाठी दापोली आगार सज्ज झाले आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी जादा बसेसच्या संगणकीय आरक्षणाला ११ जुलैपासून प्रारंभ करण्यात आले आहे. या बाबतची माहिती आगार व्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, भाईंदर, विठ्ठलवाडी, पुणे या मार्गावर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एसटीच्या प्रवाशांना सुखकर व सुरक्षित प्रवास करण्यासाठी सर्व चालक – वाहक, यांत्रिकी कर्मचारी व अधिकारी वर्ग सदैव तत्पर आहेत.

एसटीच्या प्रवासामध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षावरील व महिला प्रवाशांना ५० टक्के दरात प्रवास या सुविधा उपलब्ध असून मागणीनुसार दापोली तालुक्यातील विविध गावातून ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी संगणकीय आरक्षण करून एसटीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 14/Jul/2025