राजापुरात रानगवा सापडला मृतावस्थेत

राजापूर : राजापूर तालुक्यातील प्रिंदावण मानवाडी येथील सड्यावर शुक्रवारी वन्यप्राणी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच राजापूर वन विभागाने घटनास्थळी धाव घेत त्याची विल्हेवाट लावली असल्याची माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यांनी दिली आहे.

शुक्रवारी राजापूर तालुक्यातील मौजे प्रिंदावन येथील मानवाडी सड्यावरती वन्यप्राणी रानगवा मृत आढळून आल्याचे प्रिंदावन गावाचे ग्रामस्थ डॉ. घाटे यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी वरून कळवले होते.

त्यानंतर राजापूरचे वनपाल जयराम जाधवाने यांनी ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी वन्यप्राणी गवा मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. या रानगव्याची पाहणी वनाधिकाऱ्यांनी केली असता, तो नर जातीचा असून त्याचे वय साधारण ११ ते १२ वर्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रिंदावण मानवाडी येथे आढळून आलेल्या मृत रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुधन विकास अधिकारी राजापूर व वन अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली व पशुधन विकास अधिकारी राजापूर चोपडे यांच्यामार्फत शवविच्छेदन केले. या रानगव्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहायक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली या मृत रानगव्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती राजापूरचे वनपाल बावधाने यांनी दिली आहे.

या कामगिरीसाठी रत्नागिरी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे नितेश गुरव, सत्यवान तळवडेकर, रमेश बिर्जे, अक्षय गुरव, पांडुरंग गोंडाळ, प्रशांत राऊत उपस्थित होते. अशाप्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 14/Jul/2025