रत्नागिरी : दिवाळी हंगामासाठी दरवर्षी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ करण्यात येते; पण यंदा ही हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
२५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते; मात्र काल ती भाडेवाढ रद्द करण्यात आली. सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाकडून दरवर्षी १० टक्के भाडेवाढ केली जाते; पण यंदा हा निर्णय रद्द करण्यात आला असून, प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता; पण या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांमध्ये दिवाळी येत असून शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ्या सुटया मिळतात. याचाच फायदा घेत अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनस्थळांना भेटी देतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा होते.
दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्नवाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करते. त्याप्रमाणे यावर्षी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द केला आहे. एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होणार होती; पण ती भाडेवाढ रद्द करण्यात आली. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती.
अतिरिक्त रक्कम कमी होणार
एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही. राज्य परिवहन महामंडळाला सध्या रोज २३ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळतात. दिवाळीत करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे त्यात अधिक ६ कोटी रुपयांची भर पडते. यामुळे दिवाळीच्या सुटीच्या काळातील महिन्यात महामंडळाचे उत्पन्न ९५० ते एक हजार कोटी रुपये होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 16/Oct/2024











