रत्नागिरीत वेदश्री नृत्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव दिमाखात साजरा!

रत्नागिरी, १४ जुलै २०२५ : रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना सौ. रुपाली लिमये यांच्या वेदश्री नृत्यालयाचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम रविवार, १३ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. गेली २७ वर्षे वेदश्री नृत्यालय रत्नागिरीत विविध ठिकाणी कथक नृत्याचे शिक्षण देत आहे आणि सौ. रुपाली लिमये यांच्या अनेक विद्यार्थिनींनी कथक नृत्यात विशारद पदवी प्राप्त केली आहे.

गुरुंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि नृत्यदिग्दर्शन रुपाली मॅडमच्या विशारद झालेल्या विद्यार्थिनी सारा काळे, जिज्ञासा बोरवणकर आणि त्रिवेणी चवंडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी आपल्या गुरु रुपाली लिमये यांचे गुरुपूजन करून केली.

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री. विलास हर्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरु रुपाली लिमये यांच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नृत्यालयातील वय वर्षे ६ ते ५०+ वयोगटातील विद्यार्थिनींनी सुंदर वंदना सादर केली. यानंतर नांदी, प्रार्थना आणि एकापेक्षा एक सुंदर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. रुपाली लिमये यांच्या अनेक जुन्या विद्यार्थिनीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विद्यार्थी आणि पालकांनी यावेळी आपली मनोगते आणि भावना व्यक्त केल्या.

अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन करून विद्यार्थिनींनी आपल्या गुरुला एक सुखद धक्का दिला. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी गुरु रुपाली लिमये यांनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 14-07-2025