चिपळूण : स्वराज्य स्थापनेत शिवरायांनी रयत हा घटक केंद्रबिंदू मानून गडकिल्ल्यांना प्राधान्य दिले आणि या गडकिल्ल्यांनीच खऱ्याअर्थाने परकीय सत्तेपासून स्वराज्याचे रक्षण केले, असे प्रतिपादन प्रा. दत्ता वाघ-पाटील यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास व करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गडकिल्ले संवर्धन’ या विशेष व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी
अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते प्रमुख अतिथी शिवव्याख्याते प्रा. दत्ता वाघ-पाटील आणि दुर्गसेवक राजेश शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. पाटील पुढे म्हणाले, गडकिल्ल्यांची निर्मिती आणि गडकिल्ला लढताना स्वराज्यातील निष्ठावान आणि विश्वासू सेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच हे गडकिल्ले आज अजरामर राहिलेत. या गडकिल्ल्यांवरूनच शिवरायांनी स्वराज्याची घडी बसवली अशा या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर अशा गडकिल्ल्यांचे आजच्या काळात संवर्धन होणे ही नितांत गरज असून अशावेळी तरुणवर्गान गडकिल्ले संवर्धन मोहिमेमध्ये सहभाग घेतला पाहिजे.
यावेळी अनिरुद्ध निकम यांनी शिवरायांची गडकिल्ला स्थापनेपाठीमागील दूरदृष्टी आणि त्यांचे व्यवस्थापन किती उत्तम प्रकारचे होते हे स्पष्ट केले. यावेळी प्रा. जयसिंग चवरे, प्रा. संकेत कुरणे, प्रा. यादव, प्रा. गंगावणे, प्रा. अवनी कदम, प्रा. पूजा आवले याबरोबरच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील जावीर, तर आभार प्रदर्शन करियर कट्टा समन्वयक प्रा. जयसिंग चवरे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 14/Jul/2025














