रिक्षा व्यावसायिकांनी आपल्या कुटुंबासह पाल्यांसाठीही वेळ द्यावा : पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे

कडवई : रिक्षा व्यवसाय करत असताना व्यावसायिकांनी आपल्या कुटुंबासाठी व आपल्या पाल्यासाठीही वेळ देण्याचे आवाहन संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी केले. कडवई येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात रिक्षा व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पाल्याच्या शिक्षणासाठी विशेष मेहनत घेऊन त्यांना भविष्यात पोलिस, सैन्यात किंवा त्यांच्या आवडत्या क्षेत्रात भरती होण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यावे. प्रबळ इच्छाशक्ती असल्यास हे कठीण नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना चांगली सेवा देत असतानाच त्यांच्याशी सौजन्याने वागून व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी कडवई-तुरळ-चिखली रिक्षा मालक चालक संघटनेचे ८० रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप करताना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकातील सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाचे तसेच उपनिरीक्षक नागरगोजे यांचे आभार मानले. यावेळी कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, संघटनेचे उपाध्यक्ष संदीप चिले, सचिव मोहन ओकटे, सहखजिनदार राजेंद्र येलोंडे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 14/Jul/2025