चिपळूण : चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे चिपळूण तालुका खड्यात गेला आहे, अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी केली आहे. वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांची हाडे मोडत असताना शासकीय अधिकारी सुस्त आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नरक यातना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुहागर-विजापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. प्रत्यक्षात या मार्गाची अवस्था ग्रामीण मार्गापेक्षाही वाईट आहे. उक्ताड, मिरजोळी रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात. बहादूरशेख नाक्यापासून पुढे सती, पेढांबे, कान्हे पिंपळी, मुंढे, शिरगाव, सय्यदवाडी, पोफळी होडेवाडी गावापर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या ग्रामीण भागातील अनेक रस्ते खड्यात गेले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुंभालों घाटमार्गे चिपळूणला आले. येताना त्यांना कुंभार्ली घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रचंड त्रास झाला. साच घाटातून ये-जा करत असतात.
चिपळूणला आल्यानंतर त्यांनी कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली होती. चिपळूणसह गुहागर, दापोली आणि खेडमधील नागरिक औषधोपचाराच्या निमित्ताने याच घाटातून पश्चिम महाराष्ट्रात जातात. औषधोपचार घेऊन परत येणारे नागरिक घाटातील खड्ड्यांमुळे पुन्हा आजारी पडत असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. एसटीसह मालवाहतुकीची वाहने खड्यामुळे येथे पावसाळ्यात अनेक लहाने मोठे अपघात झाले आहेत. वाहने खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांचे भाग निकामी होत आहेत.
त्यामुळे अनेक वाहने रस्त्यात बंद पडतात. शरद पवार यांनी कान टोचल्यानंतर संबंधित विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती होईल असे वाटले होते; परंतु पाऊस कमी झाल्यानंतरसुद्धा घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक आहे की नाही? असा प्रश्न पडतो. चिपळूणमध्ये नोकरी करणारे अनेक शासकीय अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. सुट्टीच्या दिवशी ते याच रस्त्याने घरी जातात मग त्यांना घाटातील खड्डे दिसत नाही का? घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीवर आणि संरक्षक भिंतीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्याच पैशांमध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करता आला असता आणि त्यातून प्रवाशांना दिलासा देता आला असता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 16/Oct/2024










