मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत

मंडणगड : जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे आदेशानुसार सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांचे कालावधीसाठीच्या मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण १४ जुलै २०२५ रोजी कायम करण्यात आले. याकरिता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार संजय गुरव या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण सोडतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षणासाठी २०११ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातील नमूद प्रवर्गाची टक्केवारी लक्षात घेण्यात आली. त्यानुसार अनुसुचित जाती प्रवर्गासाठी दहागाव व सोवेली या ग्रामपंचायती राखीव झाल्या, यात सोवेली या ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण पडले. अनुसुचीत जमाती प्रवर्गासाठी कादवण, तिडे तळेघर व घोसाळे या ३ ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. यातील कादवण ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण पडले.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तेरा ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या. यातील बाणकोट, भोळवली, दाभट, जावळे, पाट, विन्हे, तुळशी या ग्रामपंचायतीमध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव हे आरक्षण पडले. तर भिंगळोली, लाटवण, मुरादपूर, उमरोली, वाल्मिकीनगर, लोकरवण या ग्रामपंचातीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण हे आरक्षण पडले.

खुल्या प्रवर्गासाठी दुधेरे बामणघर, कुडुकखुर्द, माहू-बोरघर, पणदेरी, पालघर, पालवणी, पिंपळगाव, पाले, शिरगाव, सावरी, तोंडली, उन्हवरे, उंबरशेत, वेळास, बलौते, अडखळ या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव हे आरक्षण पडले तर घराडी, बहिरवली, कुंबळे, म्हाप्रळ, वेसवी, चिंचघर, कोंडगाव, निगडी, पेवे, पिंपळोली, पडवे, शिगवण, सडे, देव्हारे, गोठे या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 15/Jul/2025