… अन्यथा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवणार; जवळेथरचे खुशिराम मोरे यांचा इशारा

पाचल : जवळेथर येथील केंद्रशाळेस गेली अनेक वर्षे अर्ज, विनंत्या करून आणि प्रत्यक्ष संपर्क साधूनही पुरेसे शिक्षक देण्यास शासन-प्रशासन टाळाटाळ व दुर्लक्ष करत आहे. येत्या आठ दिवसांत एक उपशिक्षक आणि कायमस्वरूपी केंद्रप्रमुख देण्यात आला नाही, तर राजापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवण्याचा इशारा जवळेथर गावचे माजी सरपंच खुशिराम मोरे यांनी दिला आहे.

जवळेथर केंद्रशाळेची पटसंख्या चांगली आहे. या शाळेचे केंद्रप्रमुखपद अनेक वर्षे रिक्त आहे. सद्यस्थितीत या शाळेच्या एका शिक्षकाला प्रभारी केंद्रप्रमुखाचा चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे हे शिक्षक बहुतांशी शासन कार्यक्रम आणि बैठका यासाठी बाहेर असतात. याचादेखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

हे प्रभारी केंद्र प्रमुखपद अन्य शाळेतील शिक्षकांना देण्याची मागणी मोरे यांनी केली आहे. त्याऐवजी जवळेथर केंद्रशाळेला स्वतंत्र शिक्षक देण्यात यावा. त्याचबरोबर एक उपशिक्षक देण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

यासाठी आम्ही अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. मात्र प्रशासन, शासन आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. येत्या आठ दिवसांत आमच्या या दोन्ही मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही, तर आम्ही सर्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा भरवण्याचा स्पष्ट इशारा खुशिराम मोरे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 15/Jul/2025