Eng vs Ind 3rd Test : लॉर्ड्स जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलं, इंग्लंडचा विजय; मालिकेत घेतली 2-1 ने आघाडी

England vs India 3rd Test Update : क्रिकेटच्या महाकुंभात ‘क्रिकेटची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

सामन्याचा प्रारंभ दोन्ही संघांनी सारख्याच ताकदीने केला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावांची दमदार खेळी केली, त्याला भारतानेही तितक्याच धावांनी म्हणजे 387 धावांनी प्रत्युत्तर दिलं. एक क्षण असा वाटला की सामना बरोबरीत फसू शकेल. पण मग इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतापुढे 193 धावांचं आव्हान उभं केलं, पण पाचव्या दिवशी एकामागोमाग एक विकेट्स कोसळल्या आणि भारताचा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. रवींद्र जडेजाने भारताच्या विजयाच्या आशा बराच काळ जिवंत ठेवल्या, परंतु पराभवापासून वाचू शकला नाही.

इंग्लंडचा पहिली डाव : रूटचं शतक, बुमराहचा पंच

इंग्लंडच्या पहिल्या डावात माजी कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावलं. त्याने 199 चेंडूंमध्ये 104 धावा करताना 10 चौकार मारले. रूटचं हे टेस्ट कारकिर्दीतलं 37वं आणि भारताविरुद्धचं 11वं शतक ठरलं. ब्रायडन कार्सने 56 तर विकेटकीपर जेमी स्मिथने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. ज्यामुळे पहिल्या डावात त्यांनी 387 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतले. नीतीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर रवींद्र जडेजानेही एक बळी टिपला.

भारताचा पहिली डाव : राहुलचं शतक, जडेजा-पंतची चमकदार खेळी

भारतीय संघाकडून पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावलं. त्याने 177 चेंडूंमध्ये 100 धावा करताना 13 चौकार मारले. राहुलचं हे टेस्ट कारकिर्दीतलं दहावं शतक असून, त्यापैकी 9 शतके परदेशात आली आहेत. उपकर्णधार ऋषभ पंतने 74 तर रवींद्र जडेजाने 72 धावांची जबरदस्त खेळी केली. भारतानेही तितक्याच, म्हणजे 387 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सने सर्वाधिक 3 बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. स्पिनर शोएब बशीर आणि ब्रायडन कार्स यांना प्रत्येकी 1 यश मिळालं.

इंग्लंडचा दुसरा डाव : वॉशिंगटन सुंदरची दमदार गोलंदाजी

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्सने 33, हैरी ब्रूकने 23 आणि झॅक क्रॉलीने 22 धावा करत उपयोगी योगदान दिलं. भारताकडून ऑफस्पिनर वॉशिंगटन सुंदरने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी मिळवले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. नीतीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप यांनीसुद्धा प्रत्येकी 1 विकेट मिळवली. इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं.

भारताचा दुसरा डाव : शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल नापास

लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघाची दुसऱ्या डावात सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गेली, जो आपले खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने करुण नायर (14 धावा), कर्णधार शुभमन गिल (6 धावा) आणि नाईटवॉचमन आकाश दीप (1 धाव) यांचे विकेटही गमावले. आज भारताने चार विकेटवर 58 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सहा विकेट शिल्लक होत्या. त्यावेळी राहुल क्रीजवर होता. सुरुवातीच्या सत्रात भारताने ऋषभ पंत (9 धावा), केएल राहुल (39 धावा) यांचे बळी गमावले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला खाते उघडता आले नाही. त्यानंतर नितीशही पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या सत्रात जडेजाची साथ जसप्रीत बुमराहसोबत होती. दोघांमध्ये 132 चेंडूत 35 धावांची भागीदारी झाली, जी बेन स्टोक्सने मोडली. त्याने बुमराहला सॅम्युअल कुकने झेलबाद केले. 54 चेंडूत पाच धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर जडेजाची साथ मोहम्मद सिराजने घेतली. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी 80 चेंडूत 23 धावा जोडल्या. सिराजला शोएब बशीरने बोल्ड केले. तो फक्त चार धावा करू शकला तर जडेजा 181 चेंडूत 61 धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. त्याने 150 चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २५ वे अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी तीन बळी घेतले तर ब्रायडन कार्सला दोन यश मिळाले. त्याच वेळी, ख्रिस वोक्स आणि शोएब बशीरने प्रत्येकी एक विकेट घेतला.