पुणे: पुण्यातील पुरंदर हायलँड्स या शेतकरी उत्पादक कंपनीने जगातील पहिला अंजिराचा पेटंटेड ज्यूस बनवला आहे. येथील भौगोलिक मानांकन मिळालेल्या अंजिराला या शेतकऱ्यांनी जगाच्या पटलावर दाखल केले आहे.
केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही हा ज्यूस निर्यात जात आहे. तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या या प्रयोगामुळे परिसरातील अंजीर उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा तसा दुष्काळी तालुका. पावसाचे प्रमाण कमी असल्याने इथे कोरवाहू पीके होतात. त्याबरोबरच अंजीर, सिताफळ ही फळपीके प्रामुख्याने पुरंदर तालुक्यात घेतली जातात. येथील अंजिराला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे भारतातून खूप मोठी मागणी असते. येथील अंजीर भारताच्या बाजारपेठेत भाव खातात पण टिकवणक्षमता कमी असल्यामुळे या अंजिराची निर्यात करण्यासाठी अडथळे येत होते. पण २०२१ साली स्थापन झालेल्या पुरंदर हायलँड्स या शेतकरी उत्पादक कंपनीने यावर मात केली.
पुरंदर हायलँड्सच्या शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी मिळून भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला अंजिराचा ज्यूस तयार केला आहे. या ज्यूसमध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त फळाचे प्रमाण आहे. कुठलेच कृत्रीम रंग, वास किंवा रिफाईन्ड शुगरचा यामध्ये वापर केलेला नाही. या ज्यूसच्या प्रक्रिया आणि उत्पादनाला पेटंट मिळाले असून ट्रेडमार्कही रजिस्टर केला आहे. तर हा ज्यूस आता केवळ पुरंदरच्या अंजिरापासूनच तयार केला जाणार आहे.
हा ज्यूस तयार करण्यसाठी बराच काळ संशोधन आणि विकासाचे काम करावे लागले. बऱ्याच ट्रायल केल्यानंतर अखेर अंजिराचा ज्यूस बाजारात आणला असून तो आता जगाच्या बाजारपेठेत निर्यात केला जात आहे. मागील आठवड्यामध्ये दुबई येथे गल्फ फूड एक्स्पोमध्ये हा ज्यूस ठेवण्यात आला होता. आखाती देशांमध्ये अंजिराला धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे हा ज्यूस तिथे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. हा ज्यूस पुरंदरच्या शेतकऱ्यांना आता जागतिक पातळीवर ओळक करून देत आहे.
तरूण शेतकऱ्यांची फळी
पुरंदर हायलँड्समध्ये तरूण शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग केला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहन उरसळ आणि संचालक अतुल कडलग यांच्यासहीत इतर संचालकांच्या पुढाकारामुळे या कंपनीने हे यश प्राप्त केलं आहे. त्याचबरोबर पुरंदर हायलँड्सकडून फ्रेश सिताफळ आणि फ्रेश अंजिराची निर्यातही केली जात आहे.
शेतकरी जगाच्या पटलावर दाखल
अंजिरापासून बनवलेल्या ज्यूसला पेटंट मिळाल्यामुळे येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जगात या ज्यूसची मागणी वाढत असल्या कारणाने अंजिराचे दर वाढून येथील प्रक्रिया उद्योगाला भरारी मिळेल. तसेच या प्रयोगामुळे पुरंदरचा शेतकरी जगाच्या पटलावर दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 16-10-2024