लांजा, दि. १५ जुलै: लांजा शहरातील कनावजेवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीतील शवदहन स्टँडमधून सुमारे दोन महिन्यांपासून ते १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान ३१ हजार रुपये किमतीच्या पितळी प्लेट्स (भिड धातूच्या) चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघा अज्ञात आरोपींविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लांजा बौद्धवाडी येथील रहिवासी रवींद्र विजय कांबळे (वय ४३) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, लांजा नगर पंचायतीच्या कनावजेवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शवदहनासाठी असलेल्या स्टँडमधील एकूण ३१ पितळी प्लेट्स चोरीला गेल्या आहेत. प्रत्येक प्लेटची किंमत अंदाजे १००० रुपये असून, एकूण ३१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या चोरीमध्ये काळपट रंगाचे शर्ट घातलेला एक इसम आणि पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेला अनंत राजका रेवाळे (वय ३५, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) या दोघांचा सहभाग असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपींनी संगनमताने आणि नगर पंचायतीच्या संमतीशिवाय या प्लेट्स चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लांजा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३०५(३) नुसार गु.र.नं. १४०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 15-07-2025














