लोकमान्य वाचनालयच्या वतीने लांजा येथे वाचन प्रेरणा दिन आणि ग्रंथप्रदर्शन उत्साहात

लांजा : वाचनालये वाचकांवर सुसंस्कार करतात. त्यामुळे वाचनालयाकडे पावलं वळली पाहिजेत असे प्रतिपादन लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांनी केले.

लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे बालपण त्यांचे कार्य, ते घडले कसे त्यांची बालपणातील आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किस्से सांगून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

सर्वप्रथम डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची प्रतिमा पूजन विजय बेर्डे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अँड. अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विजय हटकर, सल्लागार प्रमोद शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यानंतर लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेचे वाचक सभासदांमध्ये सन २०२३-२४ सालात जास्तीत जास्त पुस्तके वाचन करणा-या सभासदांमध्ये बालवाचक कु. जिर्या मंगेश लांजेकर, महिला सभासद सौ. ज्योती सुरेश दीक्षित तर पुरुष सभासदांमध्ये श्री. दत्तात्रय ताटके यांचा आदर्श वाचक म्हणून प्रशस्तीपत्र, ग्रंथ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी पदवी संपादन केली तर कार्यवाह उमेश केसरकर यांना जिल्हा परिषद रत्नागिरीचा सन २०२४ सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि वाचनालयाची संचालक विजय हटकर यांना जागतिक पर्यटन मित्र पुरस्कार मिळाला या सर्वांचे वाचनालयाच्या वतीने ग्रंथ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन रामचंद्र लांजेकर यांनी केले. त्यानंतर लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजीत जेधे यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य त्यांचे अनुभव सांगून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक, कर्मचारीवृंद, वाचक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 16/Oct/2024