चिपळूण : गुरुकुलच्या शिक्षणाची सुरुवात प्रथम आपल्या घरातून म्हणजेच आई जवळून होते. उत्तम लेखन करता यायला हवं असेल, तर सजगता असणे महत्त्वाचे आहे. चांगले तेच बोलणे, आणि चांगले तेच पाहणे याचे अनुकरण करायला जमले की दैनंदिन वाचनाच्या जोरावर लेखन करणे शक्य होते. दररोज काही ना काही वाचावे आणि आपल्याला ज्याचे आकलन झाले आहे, त्यावर थोडं तरी लिहावे. असा सराव केल्यास लेखन शैली आत्मसात करणं सहज शक्य होतं असा प्रतिपादन लेखक जितेंद्र पराडकर यांनी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत केले.
देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जाणारा शाळेतील वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा उत्सव म्हणजे वाचन प्रेरणा दिन! वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड चिपळूण प्रशालेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध लेखक आणि पैसा फंड हायस्कूल येथील जेष्ठ कलाअध्यापक जितेंद्र पराडकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुरुकुल विभागातील उपक्रमशील कलाशिक्षक पराग लघाटे यांनी लेखक जितेंद्र पराडकर यांच्या लेखन प्रवासाच परिचय करुन दिला. युनायटेडच्या गुरुकुल विभागातील सुरभी चितळे (८वी) अवंतिका जाधव (७वी) अवनी भुवड (७वी) चंद्रभान यादव (५वी) उदय पवार (५वी) आणि आयुष कानडे (५वी) या सहा विद्यार्थ्यांनी पराडकर सरांची अतिशय उत्तम तयारीने प्रकटपणे मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. या मुलाखती मधून बालवयापासून वडिलांच्या शिस्तीच्या देखरेखीखाली कलेची आवड जोपासणारा विद्यार्थी ते आज नऊ दहा स्वतःची पुस्तके प्रकाशित झालेला लेखक असा पराडकर सरांचा विलक्षण प्रवास अडीचशे विद्यार्थ्यांसमोर सहज संवादातून उलगडला. या मुलाखतीसाठी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त धनंजय चितळे व संस्था प्रतिनिधी अभय चितळे पूर्णवेळ उपस्थित होते.
तत्पूर्वी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने युनायटेड चिपळूणच्या ग्रंथालय विभागामार्फत ०१ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत’ वाचन पंधरवडा’ आयोजीत केला होता. यामध्ये मुलांना ग्रंथालय विभागातून प्रत्येकी एक पुस्तक वाचनासाठी देऊन ते वाचनासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आली. या आठवड्याभरात मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण, परिचय आणि पुस्तक रसग्रहण मुलांनी कसे करावे याविषयीची मुलांना माहिती सांगण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. ०८ ऑक्टोबर रोजी पाचवी ते सातवीच्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे पुस्तक परिचय आणि आठवी ते दहावीच्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचे रसग्रहण नेमून दिलेल्या वेळेत शाळेकडून पुरवण्यात आलेल्या कागदावर लिहून दिले. शंभरपेक्षा जास्त उत्साही मुलामुलींचा सहभाग असलेल्या या अनोख्या रसग्रहण व पुस्तक परिचय स्पर्धेतून मराठी भाषा विषय शिक्षकांच्या सहकार्याने दोन्ही गटातून सर्वोत्तम तीन तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
जितेंद्र पराडकर, धनंजय चितळे, अभय चितळे, प्रशालेचे उप मुख्याध्यापक बनसोडे व पर्यवेक्षक मुंढेकर सर इत्यादी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून पराडकर यांनी लिहिलेली पुस्तकेच देण्यात आली. धनंजय चितळे यांनी आपल्या मनोगतातून वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुलांनी लवकरच स्वतः लिहिलेल्या साहित्यासाठीचा कोपरा तयार करण्याविषयीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राची भावे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन राजेश धापसी सर व ग्रंथपाल सौ. तांबे मॅडम यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील मॅडम व गुरुकुलचे विभाग प्रमुख मंगेश मोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले व पूर्ण आयोजनात गुरुकुल विभागातील विदयार्थी, अध्यापक यांचे विशेष सहकार्य मिळाले, कार्यक्रमाचे सत्रसंचालन सौ. प्राची भावे यांनी केले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 16/Oct/2024











