रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील नांदगाव, गुरववाडी येथे सावर्डे पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका व्यक्तीला बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल, १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपीकडून ६१० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष रघुनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल महादेव रसाळ (वय ५५, रा. नांदगाव, गुरववाडी, ता. चिपळूण) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा (गु.र.नं. ७०/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नांदगाव येथील एका घराच्या बाजूला असलेल्या गडग्याच्या आडोशाला छापा टाकला. त्यावेळी आरोपी अनिल रसाळ हा १८० मिली मापाच्या एकूण ८ जी.एम. देशी दारूच्या क्वार्टरसह आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ६१० रुपये आहे.
सावर्डे पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात केलेल्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 16-07-2025














