मंडणगडातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अॅड. सकपाळ यांचे नाव देण्याचे कुणबी सेवा संघाची मागणी

मंडणगड : मंडणगड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला माजी आमदार व समाजनेते (कै.) अॅड. जी. डी. सकपाळ यांचे नाव द्यावे, अशी मागणी मंडणगड तालुका कुणबी सेवा संघातर्फे तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या निर्णयानुसार मंडणगड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला समाजसुधारकांचे नाव देण्यात आले आहे. माजी आमदार अॅड. जी. डी. सकपाळ यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. मंडणगड तालुक्यातून स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या या सामाजिक नेतृत्वाने कोकणात मोठ्या संख्येने सापडणाऱ्या हिंदू तिलोरी कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य केले आहे. मंडणगड तालुक्यातून निवडून गेलेले ते एकमेव आमदार आहेत. सर्वार्थाने मागास असलेल्या या समाजाला अँड. सकपाळ यांनी विकासाच्या प्रवाहात आणले. शैक्षणिक व सामाजिक मागसलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य खर्ची पाडले आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अॅड. सकपाळ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, विजय ऐनेकर, रघुनाथ पोस्टुरे, सुभाष सापटे, योगेश पवार आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 16/Oct/2024