एमपीएससी ची गट ‘ब’ आणि ‘क’च्या परीक्षा स्वतंत्र होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा एकत्र घेण्यात येत होती. मात्र, या पुढील काळात गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा वेगवेगळी घेण्याचा निर्णय एमपीएससीमार्फत घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा स्वतंत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेसाठी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षाकरिता जाहिरात प्रसिद्ध करुन दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यार्थ्यांकडून विरोध होत असल्याने शासनाने स्वतंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट ब (अराजपत्रित) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची संख्या वाढती आहे. तसेच निकाल प्रक्रियेतील आलेल्या तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, त्या अनुषंगिक न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या बाबींचा विचार करून स्वतंत्रपणे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय
स्वतंत्र परीक्षा घेतल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संधी कमी झाल्या होत्या. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत होता. आता दोन्ही परीक्षा स्वतंत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 16/Oct/2024