रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब वृक्षाचा पहिला वाढदिवस आज बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधील ‘एक झाड आईच्या नावे’ या आवाहनाला प्रतिसाद देत, तसेच ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून, दिवंगत व्यक्तींच्या नावाने ६०० रोपांचे मोफत वाटप करून या कार्यक्रमाला वेगळेपण देण्यात आले.
बुधवारी सकाळी ग्रंथालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात धामणसे गावाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या २० दिवंगतांच्या नावाने रोपे वाटप करण्यात आली. गतवर्षी लावलेल्या कदंब वृक्षाला ग्रंथालयाला मोफत जागा देणाऱ्या कै. श्रीमती शकुंतला शंकर कानडे यांचे नाव देण्यात आले आहे. या अनोख्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडाला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर केकऐवजी कलिंगड कापून हा उत्सव साजरा झाला. शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि ग्रंथालयाचे संचालक असे सुमारे २०० जण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
यावेळी बोलताना ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी म्हणाले की, “संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. एका पेटीत पुस्तके ठेवून हे ग्रंथालय सुरू झाले होते. पूर्वीच्या लोकांनी ते चालवले म्हणूनच मला आज काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला काम करायचे असेल तर आपली रेष मोठी करावी लागते.” त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, वाचल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. यंदा ग्रंथालयातर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडूनिंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या ६०० रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्ग जपूया, आनंदी होऊया”, “उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली” अशा विविध घोषणा देत जनजागृती केली. झाड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
सरपंच अमर रहाटे यांनी ग्रंथालयाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. “संस्थेने कसे जागरूकपणे कार्यक्रम करावे हे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून दाखवत हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहेत,” असे ते म्हणाले. आज उमेश कुळकर्णी यांचा वाढदिवस असल्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम केले पाहिजेत, असेही त्यांनी सुचवले. अनेकजण स्वतःचा वाढदिवस केक कापून साजरा करतात, तसा झाडाचाही वाढदिवस साजरा करणे कौतुकास्पद आहे, असे रहाटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पांचाळ यांनी केले, तर चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालक व ग्रामपंचायत सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक जाधव, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, सदस्य प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दीपक रेवाळे, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे, नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी हृषिकेश मयेकर, सेल्फ लेस सर्व्हिंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त, मानसशास्त्रज्ञ गौरी चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आंबा व्यापारी बंड्या हर्षे, अनंत गोताड, मारुती लोगडे, माध्यमिक विद्यालयाचे श्री. सुतार, श्री. गायकवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे मॅडम व अन्य शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 16-07-2025














