रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): जिल्ह्यांतील नोकरी शोधणाऱ्या तरुणाईसाठी एक आनंदाची बातमी आहे! कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली येत्या २२ जुलै २०२५ रोजी, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळे येथे एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जिल्ह्यांतील अनेक नामांकित उद्योजक, सेवा क्षेत्रातील कंपन्या आणि सहकारी संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा. लि., जीवन विमा निगम, श्री स्वामी स्वरूपानंद सहकारी संस्था, पेठे ब्रेक मोटर्स प्रा. लि. (मोडकाघर, पो. वेरवली, ता. गुहागर), आणि एमआय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा. लि. (पांडवनगर टी.आर.पी.) यांसारख्या आस्थापनांचा समावेश आहे.
या कंपन्यांनी विविध पदांसाठी जवळपास ५०० उमेदवारांची मागणी नोंदवली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी जिल्ह्यांतील सर्व पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
इच्छुकांनी २२ जुलै २०२५ रोजी थेट फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी येथे आपला बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही संधी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते, त्यामुळे वेळेवर उपस्थित राहून या संधीचा पुरेपूर फायदा घ्या!
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 16-07-2025














