मंडणगड : वादळी वाऱ्यासह पुनर्वसू सरींमुळे घरे, गोठ्यांसह शेतीचे नुकसान

मंडणगड : पुनर्वसू नक्षत्रात बरसलेल्या सरींनी मंडणगडला चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या सरीवर सरींनी तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. या मुसळधार पावसांत घरे, गोठ्यांसह शेतीचेही नुकसान झाले. मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत ११ लाख ६० हजार ४४० रुपयांची नैसर्गिक हानी झाली आहे.

दोन दिवस सतत पावसामुळे १५ जुलैला तालुक्यातील मौजे दहागाव येथील ग्रामस्थ दिलावर कादिर वावघरकर यांच्या घराची पडझड झाली. यात घराचे ३७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. आतापर्यंत अंशतः घरे २ लाख २९ हजार ३९०, अंशतः गोठे २ लाख ९७ हजार २५०, मृत जनावरे ३५ हजार, संरक्षक भिंत ९७हजार, शाळा ५० हजार, अंगणवाडी ३५ हजार, दुकाने ३ लाख, पोल्ट्री फार्म ७९ हजार असे नुकसान झाले आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. १६) पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. १६ जुलैला तालुक्यात ८८.७५ मिमी पावसाची नोंद झाली. यात मंडणगड महसूल मंडळात सर्वाधिक ११० मिमी, तर म्हाप्रळ महसूल मंडळात सर्वात कमी ६७ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात ६२ हजार ७५० रुपयांच्या नुकसान निधीचे वाटप करण्यात आल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 17/Jul/2025