खेडमध्ये सेवानिवृत्त नागरिकाच्या घरातून दागिने व रोख रकमेसह देवाच्या मूर्तींची चोरी

रत्नागिरी, १६ जुलै : खेड तालुक्यातील बोरज येथील घासोळकरवाडी येथे एका सेवानिवृत्त नागरिकाच्या घरातून रात्रीच्या सुमारास देवाच्या चांदीच्या मूर्ती, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४१,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १५ जुलै रोजी रात्री १० ते १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी कमलाकर गोविंद घोसाळकर (वय ६६, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. बोरज, घासोळकरवाडी, खेड, जि. रत्नागिरी) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय खालील वस्तू चोरून नेल्या आहेत:

८,००० रुपये किमतीची दत्त देवतेची चांदीची उभी मूर्ती (सुमारे १०० ग्रॅम वजनाची)

८,००० रुपये किमतीची गणपती देवतेची चांदीची बैठ मूर्ती (सुमारे १०० ग्रॅम वजनाची)

२०,००० रुपये किमतीचे पत्नीच्या कानातील सोन्याच्या कुड्या (सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या, २० वर्षांपूर्वी बनवलेल्या)

५,००० रुपये किमतीच्या ५०० रुपये दराच्या १० चलनी नोटा

५०० रुपये किमतीचा सोन्याचे पॉलिश दिलेला नकली हार

या चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत ४१,५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

खेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 17-07-2025