संगमेश्वर : तालुक्यातील उमरे धरण गेली दोन वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या धरणाला गळती सुरू झाल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून गेल्या दोन वर्षांपासून या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या परिसरातील उमरे, भीमनगर, वाडा वेसराड, भेकरेवाडी, मलदेवाडी, कळंबस्ते, फणसवणे, कोंड उमरे, अंत्रवली, कसबा कुंभारवाडी आदी सुमारे दहा गावांतील लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
या धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सीडब्ल्युपीआरएसकडे पुण्यातील प्रलंबित असून, त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि त्या प्रस्तावाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले आहे. हा मुद्दा त्यांनी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्षही वेधले आहे. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकर सुरू होईल, अशी आशा आहे, असे कोंडउमरे गावचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 17/Jul/2025











