गावतळे : दापोली तालुक्यातील शिवाजीनगर आणि साखलोळी नं. १ या दोन गावांना जोडणारा गावतळे टाळसुरे रस्त्यावरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलावरील आरसीसी सळ्या बाहेर आल्या आहेत.
कारीवणे नदीवरील जुना पूल २३ सप्टेंबर २०१६ रोजी कोसळला होता. संजय कदम त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तेव्हा त्यांच्या प्रयत्नातून हा पूल बांधण्यात आला, मात्र २०२४ पासून हा नवीन पूल धोकादायक बनला होता. त्यावेळीही आरसीसी सळ्या बाहेर पडल्या होत्या. शिवाजीनगर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला यासंदर्भात पत्र लिहिले होते, त्यानंतर वरवर मुलामा देऊन वर आलेल्या सळ्या झाकण्यात आल्या होत्या. या पावसाळ्यात त्या सळ्या परत बाहेर आल्या असून, मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. गावतळेमार्गे शिवाजीनगर, साखलोळी नं. १ करत हा रस्ता टाळसुरे येथे दापोली-खेड रस्त्याला जाऊन मिळतो. गावतळे परिसरातील ३२ गावांना दापोलीत जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असून, या मार्गावर दिवसभर रहदारी असते.
शिवाजीनगर ग्रामपंचायतीने २०२४ व २०२५ दोन्ही वर्षी जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी याविषयी पत्रव्यवहार केला असून, धोकादायक पुलाविषयी वारंवार माहिती दिली असून, त्यांनी एकवेळा त्या सळ्या झाकण्यासाठी वरवर मुलामा दिला होता. यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून हा पूल वाहनचालकांसाठी सुरक्षित होईल- सुभाष घडवले, उपसरपंच, शिवाजीनगर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 17/Jul/2025














