चिपळुणातील घरफोड्यांचे पोलिसांसमोर आव्हान

चिपळूण : चिपळुणात गेल्या महिन्यात घरफोड्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घरफोड्यांचा तपास लावण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असून अद्याप त्याला यश मात्र आलेले नाही. शहरातील गोवळकोट रोड तसेच कापसाळ व अन्य ठिकाणी घरफोड्या झाल्या.

या घरफोड्यांमध्ये मोठा ऐवज लंपास झाला नसला तरी एकाचवेळी अनेक सदनिका फोडण्यात आल्या. कापसाळमध्ये देखील एकाच रात्री सात बंद घरे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही. या घरफोड्यांनंतर पोलिसांनी शहर व परिसरात गस्त वाढवली आहे. रात्रीच्यावेळी पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिलेले आहे. यातील काही चोरींमध्ये चोरटे सीसीटीव्हीत चित्रीत झाले आहेत. त्यामध्ये दोन संशयित असून त्यांची आय-१० गाडी सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या शिवाय दोन संशयित चोरटे स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

कोणत्याही प्रकारचा मास्क न लावता चोरटे राजरोसपणे चोरी करताना व परिसरात वावरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले असून त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. चिपळूण पोलिसांनी पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक त्यासाठी नेमले असून जोरदार तपास करण्यात येत आहे. चोरट्यांचे छायाचित्र मिळूनदेखील अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश येत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले. आहे. आता पोलिस अधिक दक्ष झाले असून रात्रीची गस्त आणि पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.

चिपळुणात ८६ सीसीटीव्ही कॅमेरे..
जिल्हा नियोजनमधून चिपळूण शहर परिसरासाठी ८६ सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. त्यातील ९० टक्के सीसीटीव्ही बसविण्यात आले असून अत्याधुनिक प्रकारचे हे सीसीटीव्ही आहेत. त्या माध्यमातून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनाची नंबर प्लेट आणि गाडीचा नंबरही सहजपणे पोलिसांना उपलब्ध होत आहे. उच्च दर्जाचे हे सीसीटीव्ही असून त्यातून दिवस-रात्र घडणाऱ्या घटना चित्रीत होणार असून त्याचे फुटेज पोलिसांजवळ असणार आहे. यातून अनेक गुन्हे, अपघात यांचा उलगडा होणार आहे. शहरातील प्रमुख पॉवर हाऊस, बहादूरशेख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका), जुना स्टॅण्ड आदी भागात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अजूनही काही ठिकाणी कॅमेरे बसविणार असल्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 17/Jul/2025