देवरुख : नजीकच्या आंबव येथील महाविद्यालयामध्ये नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. एमरटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लांजा-रत्नागिरी यासारख्या शेतीआधारित उत्पादने, उपउत्पादने तयार करणे तसेच त्यांच्या व्यापारासाठी टेक्नॉलॉजीयुक्त प्रणाली उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असणाऱ्या कंपन्यांशी हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन तसेच या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी याद्वारे प्राप्त होणार आहेत. प्र. शि. प्र. संस्थेच्या अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन तसेच फार्मसी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना या सामंजस्य कराराचा लाभ मिळणार आहे. सेमिनारच्या माध्यमातून यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यादरम्यान आंबव जि. प. प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी पेंढारी हिचा इ. पाचवी स्कॉलरशीप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष रवींद्र माने, सीईओ प्रद्युम्न माने, सौ. ईशानी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, एमरटेक इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक गौरव सोमवंशी, जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक मिथिलेश देसाई तसेच इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, राजेंद्र माने पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. नितीन भोपळे, प्रा. राहल वाटेगावकर इ. उपस्थित होते. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आभार प्रदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 17/Jul/2025














