साडवली : देवरूख आगारातून सकाळी आठ वाजता सुटणारी देवरूख-कानरकोंड-आंबेड ही बस गेले दोन दिवस अचानक रद्द केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुमारे आठ किलोमीटर पायपीट करावी लागते. यावरून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी देवरूख आगार व्यवस्थापकांना जाब विचारला.
देवरूख आगारातून सकाळ आठ वाजता देवरूख कानरकोंड ही फेरी सोडण्यात येते. ही गाडी सलग दोन दिवस सोडण्यात आलेली नव्हती. फेरी रद्द करत असल्याची माहितीही संबंधितांना देण्यात आलेली नाही. या गाडीच्या प्रतीक्षेत प्रवाशांचा खोळंबा झाला. या गाडीतून अनेक विद्यार्थी शाळेत जात असतात. त्याचबरोबर सकाळी देवरूख बाजारात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांचीही गैरसोय झाली. त्यांना खासगी गाड्यांमधून जावे लागले. महिलांना तिकिटामध्ये सूट दिली जात असल्यामुळे एसटी प्रवासासाठी महिला प्रवासी अधिक दिसतात. कानरकोंडकडे जाणारी फेरी अचानक रद्द केल्यामुळे महिलांची गैरसोय झाली होती. या प्रकारामुळे संतापालेल्या ग्रामस्थांनी शाळेतील मुलांसह देवरूख आगारात धडक दिली.
तेथील आगार व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी ताको शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हो फेरी नियमितपणे देवरूख आगारातून सोडली जावी असे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना बजावले. देवरुख आगार व्यवस्थापकांनीही फेरी नियमित सुरू राहील, असे आश्वासन दिले. या वेळी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, मुन्ना थरवळ युवासेना उपतालुकाप्रमुख तेजस भाटकर, दादा शिंदे, दीपक भेरे, दर्शन भाटकर, आंबेडचे सरपंच सुहास मायंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, हरीश्चंद्र गुरव, अनिरुद्ध मोहिते, विजय टाकळे, प्रभाकर गुरव, अशोक भडेकर, दिनेश गुरव आदींसह उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 16/Oct/2024














