चिपळुणातील ३९ शाळांची दुरुस्ती न झाल्यास मनसेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा

चिपळूण : निवडणुकांच्या तोडांवर तालुक्यातील एक-दोन नादुरूस्त शाळांच्या इमारतींची दुरुस्ती झाली. त्यानंतर शाळा दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. सध्या तालुक्यातील ३९ शाळांच्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येत्या १५ दिवसात या शाळांची तात्पुरती दुरुस्ती न झाल्यास मनसेतर्फे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

तालुक्यातील गळक्या शाळांबाबत मनसे जिल्हाध्यक्ष नलावडे म्हणाले, एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रंजी सुरू करण्याचा डिंडोरा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पिटवला जात आहे. मात्र शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. तालुक्यातील ३९ शाळांची विदारक अवस्था समोर आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी लोटूनही या शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना गळक्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.

रस्ते, पाखाड्या, संरक्षक भिंती, स्मशानभूमी यावर करोंडोंचा खर्च करणाऱ्याची शाळांबाबतची उदासीनता यातून दिसून येत आहे. ३९ शाळा नादुरूस्त असून त्याच्या दरुस्तीचे प्रस्ताव त्या-त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रासाठी जिल्हा परिषद शाळांचा समावेश करण्यात आला होता. यातील काही शाळांची दुरुस्ती झाली. मात्र अजुनही तालुक्यातील ३९ शाळा नादुरुस्त असून पावसाळ्यापूर्वी त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. शाळा दुरुस्तीमध्ये छप्पर, वर्ग खोली, खिडकी दुरुस्तीचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कार्यवाही होत नाही.

या शाळांच्या दुरुस्तीची गरज
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोंधळे भोसले, हडकणी, कोळकेवाडी जांबराई, गोवळकोट मराठी शाळा, मुर्तवडे नंबर २, कळंबट ब्राह्मण गव्हाळवाडी, उमरोली नंबर एक, चिपळूण कन्या शाळा, पाग मुलांची शाळा, असुर्डे बनेवाडी, मार्गताम्हाणे, दहिवली खुर्द, कापरे देऊळवाडा, गांग्रई गावणंवाडी नंबर एक, पाचाड नंबर एक, गुळवणे, कुंभार्ली नंबर एक, मांडकी खुर्द, राधा नगर, विर नंबर चार, खांदाट पुनर्वसन, विद्यामंदिर सती, पोफळी ऐनाचेतळे, नांदिवसे गावठाण, कामथे नंबर २, पिलवली तर्फे वेळंब, खेरशेत नंबर दोन, टाकेवाडी, कोळकेवाडी हसरेवाडी, कोळकेवाडी पठारवाडी, कोसबी घाणेकरवाडी, आगवे नंबर १, असुर्डे नंबर तीन, बोरगाव नंबर एक, उभळे नंबर दोन, नांदिवसे लुगडेवाडी या शाळांची दुरुस्ती आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 17/Jul/2025