दापोली : विद्यार्थ्यांनी अनुभवली भातलावणीची प्रात्यक्षिके

दापोली : दापोली आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फांडेशन अंतर्गत कार्यरत एन. के. वराडकर आर्टस् आणि आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने ग्रामीण विकास आणि कृषी अर्थशास्त्र या विषयांतर्गत विशेष प्रात्यक्षिकात्मक उपक्रम लाडघर येथे राबवला.

महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष व द्वितीय वर्ष अर्थशास्त्र विभागातील सुमारे ५० विद्यार्थी आणि प्राध्यापक लाडघर या गावात प्रत्यक्ष शेतात जाऊन भातलावणीच्या कामात सहभागी झाले. लाडघर भंडारवाडा येथील स्थानिक शेतकरी सुबोध कर्देकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत भातलावणीची संपूर्ण प्रक्रिया, पूर्वतयारी, पाण्याचे नियोजन, रोपे काढण्याची तंत्रे व पारंपरिक पद्धती, रोपे लावण्याची तंत्रे आणि श्रम व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी हसतखेळत, पारंपरिक शेतकरी गाणी म्हणत कोकणातील पारंपरिक कृषी परंपरा व तंत्रज्ञानाची सांगड घालत कामात हातभार लावला. या कार्यक्रमात प्रा. डॉ. लक्ष्मण सीताफुले, प्रा. डॉ. गणेश मांगडे, प्रा. जनार्दन गिरमकर यांचा सक्रिय सहभाग होता. उपक्रम कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिक अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून घेतला गेला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड यांच मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 17/Jul/2025