महाराष्ट्रात कृत्रिम फुलांवर बंदी येणार! शेतकर्‍यांना दिलासा, आरोग्याचे प्रश्नही सुटणार

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांना कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे बसणारा आर्थिक फटका आणि त्यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आठवडाभरात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी विधानसभेत दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार महेश शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती. कृत्रिम फुलांमुळे पारंपरिक नैसर्गिक फुलांची शेती धोक्यात आली असून, तब्बल दोन हजार कोटी रुपयांची फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. याचा थेट फटका राज्यातील शेतकर्‍यांना बसत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यासह आमदार कैलास पाटील, नाना पटोले आणि नारायण कुचे यांनीही कृत्रिम फुलांवर धोरणात्मक निर्णय घेऊन बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यावेळी, अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन यावर निर्णय करण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले होते.

बुधवारी पुन्हा आमदार महेश शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता, मंत्री गोगावले यांनी सांगितले की, “मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर निर्णय करण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा निर्णय आठवडाभरात जाहीर केला जाईल.” यामुळे नैसर्गिक फूल उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 17-07-2025