गुहागर : तालुक्याची आर्थिक राजधानी असणाऱ्या शृंगारतळी बाजापेठेत वाहतूक कोंडीबरोबरच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. गणेशोत्सवापूर्वी पोलिस यंत्रणेकडून या संदर्भात ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या ठिकाणी तालुक्याच्या ग्रामीण भागातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. मात्र बाजारपेठेतील काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर फूटपाथवर वस्तू विक्रीसाठी ठेवल्याने नागरिकांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. बाजारपेठेत हातगाडी व्यावसायिकांमुळेही अनेकदा वाहतूक कोंडी होते. एसटी बस थांब्याजवळच मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने या थांब्यावर एसटी बसमध्ये चढ-उतार करताना प्रवाशांना कसरत करावी लागते.
शृंगारतळी बाजारपेठेत एस.टी. थांबा ते मालाणी दुकानापर्यंत प्रवासी रिक्षा स्टैंड आहे. तर त्याच्या उजव्या बाजूला पलिकडे आबलोलीकडे जाणारी वडापची वाहने उभी असतात. एस. टी. थांब्याच्या पुढच्या बाजूला ते अगदी खाली कोकणरत्न हॉटेलच्या गेटपर्यंत हेदवी नरवण व पालपेणे वेलदूर या मार्गावर धावणाऱ्या वडापच्या गाड्या रस्त्याला खेटून उभ्या असतात. बाजारपेठेच्या जानवळे फाट्यापासून ते मळण फाट्यापर्यंतच्या दुतर्फा रस्त्यावर वाहनांनी रस्ता व्यापलेला असल्याने याठिकाणी वाहतूक मंदगतीने सरकते.
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. शृंगारतळी बाजारपेठेतील वाहतुकीची समस्या व गुरांचा त्रास यावर येथील पाटपन्हाळे ग्रा. पं.ने अनेकवेळा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलेले नाही. पाच वर्षापूवी गुहागरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या समस्येवर चर्चा करण्यासाठी ग्रा. पं. मध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते व संपूर्ण बाजारपेठेत वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून पट्टे आखले होते. त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी पोलिस शिपाई उभे करून वाहतुकीला शिस्त लावून दिली होती. परंतु सध्या वाहतूकीची समस्या अधिक उग्र झाली असून पोलिस, ग्रा. पं. व तंटामुक्त समिती यांनी कठोर होणे गरजेच असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणाचे काम मुळातच दर्जाहीन झालेले आहे. पूर्वीचा जो रस्ता या बाजारपेठेतून होता तो रुंद व सोयीस्करच होता. मात्र सध्या तयार केलेला रस्ता पूर्वपिक्षाही अरुंद आहे. त्यातच गटारांच्या पुढे रस्त्यावरच लागलेल्या हातगाड्या, खासगी वाहने यामुळे या रस्त्याची रुंदी अपुरी ठरते.
यामुळे शृंगारतळी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊन अपघाताला आमंत्रण मिळते, अशी प्रतिक्रिया उपसरपंच असीम साल्हे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 17/Jul/2025














