दापोलीतील तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू, डेरवणच्या रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास

रत्नागिरी, १६ जुलै : दापोली तालुक्यातील कुडावळे आदिवासीवाडी येथील दिपक लक्ष्मण पवार (वय ३४) या तरुणाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान ११ जुलै रोजी सकाळी ८:४६ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक पवार १० जुलै रोजी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. त्यावेळी त्याला सर्पदंश झाला. त्याला तातडीने दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारांसाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच ११ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात सुरुवातीला ००/२०२५ असा आकस्मिक मृत्यू म्हणून ११ जुलै रोजी करण्यात आली होती. त्यानंतर, संबंधित कागदपत्रे दापोली पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ९:२७ वाजता दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता सुरक्षा अधिनियम (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 17-07-2025