रत्नागिरी, १६ जुलै : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील सुतारवाडी येथे कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनंत विठ्ठल मांडवकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, १३ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत मांडवकर हे त्यांची पत्नी शुभांगी अनंत मांडवकर यांच्यासोबत मूळ गावी गावखडी येथे राहत होते. १२ जुलै रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादामुळे त्यांची पत्नी रागाने आपल्या मुलाकडे (खबर देणारे) राहण्यासाठी गेली होती. घरी एकटे असताना, अनंत मांडवकर यांनी ‘इम्पॅक्ट’ नावाचे विषारी कीटकनाशक प्राशन केले.
ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मांडवकर यांना उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच १३ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १६/२०२५, भारतीय न्यायसंहिता सुरक्षा अधिनियम (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 17-07-2025













