दापोली : पंचनदी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्यामंदिर या शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी १५ ऑगस्टपासून मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाळेची इमारत पावसाळ्यात गळते, वर्गखोल्यांत पाणी साचते, भिंतींवर शेवाळ तयार झाले असून विद्युत उपकरणांमुळे विद्युत धक्क्याचा (शॉक) धोका निर्माण झाला आहे. या पायकारक वातावरणात लहान मुले जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत.
गेल्या ५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू असतानाही कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली नाही, असा आरोप गावचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य सुंदर राणे यांनी केला. “आता सहनशक्ती संपली आहे, त्यामुळे १५ ऑगस्टपासून एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शुभदा वैशंपायन यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होता कामा नये. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
पालक, ग्रामस्थ आणि शाळा समिती यांच्यात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून, जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवले जाणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे. हा निर्णय आता तालुका आणि जिल्हा प्रशासनासाठी एक मोठा इशारा असून, प्रशासन यावर त्वरित पावले उचलते की ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, हे येणारा काळच ठरवेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 17/Jul/2025














