संगमेश्वरात वाहतूक कोंडीची समस्या; नागरिकांनी केली पोलिसांकडे तक्रार

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर कामात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरळीत व्हावे म्हणून कोणतेही नियोजन न करता सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे प्रवासी जनता तासन्तास कोंडीत अडकून पडली.

मुख्य महामार्गालगत भूमिगत सिमेंट पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. या भागात याआधीही असेच निकृष्ट आणि नियोजनशून्य काम करण्यात आले होते. निसर्गाच्या पहिल्याच झटक्यात या कामाचा फज्जा उडाल्याने ठेकेदाराला पुन्हा दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. मात्र, हे करताना वाहतुकीचे मार्ग आखणे, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे किंवा पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता राखणे अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

बुधवारी (ता. १६) आठवडा बाजाराचा दिवस असल्याने शहरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. याचा विचारही न करता दिवसभर काम सुरू ठेवल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

संतप्त नागरिकांनी कामाच्या ठिकाणी जाऊन संबंधितांना जाब विचारला आणि काम तातडीने थांबवण्यास भाग पाडले. काही नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन ठेकेदाराच्या कारभाराविरोधात तक्रारही दाखल केली.

वाट्टेल तिथे खड्डे खोदावेत, वाटेल तसा रस्ता बंद करावा आणि जनतेला वेठीस धरावं, असा हा ढिसाळ कारभार सहन केला जाणार नाही. प्रवाशाच्या सुरक्षिततेची आणि सोयी-सुविधांची कोणतीही काळजी न घेता ठेकेदार कंपनी कारभार करत आहे, असा आरोप नागरिकांनी केला.

उपाययोजनेकडे लक्ष
मुंबई-गोवा महामार्गावर कामात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे संगमेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 18/Jul/2025