चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवला. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावर धडक देत आक्रमकता दाखवली. आता उठलेला आवाज पावसाच्या सरीत शांत झाला. दरम्यान, प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर चौकशीत अडकलेल्या गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील ‘त्या’ कंपनीची २१ रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती येथील प्रदूषण नियंत्रण मडळाकडून देण्यात आली.
एका कंपनीने टाकाऊ सांडपाणी कामथे नदीत सोडल्याप्रकरणी पोलिसांनी टँकर जप्त केले होते, तर स्थानिक नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी हंगामा केल्यानंतर त्या कंपनीला उत्पादन बंदीची नोटीस दिली. त्यानंतर कंपनीच्या विनंतीनुसार, आठ तासांत या नोटिसीला दहा दिवसांची स्थगिती दिली. स्थगिती उठल्यानंतर एमआयडीसीने पाणीपुरवठा खंडित केल्याने उत्पादन ठप्प झाले; मात्र कंपनीने पुन्हा केलेल्या विनंतीनुसार, मंडळाने आठवडाभरापूर्वी उत्पादन सुरू करण्यास पुन्हा कंपनीला तात्पुरती परवानगी दिली. या प्रकरणी सोमवारी मुख्य कार्यालयात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याबरोबर सुनावणी होणार आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळ आणि टँकरमधील पाणीनमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले; मात्र हे अहवाल सारे ‘त्या’ कंपनीच्यादृष्टीने पूरक आले आहेत. कंपनीने सांडपाण्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते पाणी पिण्यास योग्य
आरोग्य विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामथे परिसरातील पाणीस्त्रोतांचे नमुने घेतले होते. त्यामध्ये पाणी पिण्यास योग्य असल्याचे म्हटले आहे. पाणी अहवाल योग्य आल्यानंतर पंधरा दिवस ताब्यात असलेले टँकर पोलिसांनी केवळ महामार्गावर वाहतुकीस अडथळा म्हणून गुन्हा दाखल करून सोडून दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 18/Jul/2025














