शृंगारतळी बाजारपेठेत आदेश झुगारून उघड्यावरच मासळी विक्री

गुहागर : गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत उघड्यावर मच्छी विक्री करण्यास पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. तसे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा आदेशाचे फलक त्या ठिकाणी लावण्यातही आले होते. मात्र, या आदेशाला मच्छी विक्रेत्यांनी ठेंगा दाखवला आहे. आदेश झुगारुन उघड्यावर मच्छीविक्री सुरू असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा यावर वचक नसल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.

शृंगारतळीत ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात मच्छीमार्केट शेड बांधली आहे. आता नव्याने तिची दुरुस्तीही करण्यात आली आहे. या शेडमध्येच बसून मासळी विक्री करायची असे बंधन आहे. मात्र, मासळी विक्रेत्या महिला या शेडमध्ये न बसता बाहेर नाका, चौक, बाजारपेठ येथे ठाण मांडून बसून मासळी विक्री करतात. ग्राहकांनाही मासळी मार्केटला न जाता ठिकठिकाणी असणार्‍या मच्छी विक्रेत्या महिलांकडून मच्छी खरेदी करणे सोपे जाते. त्यामुळे उघड्यावरील मासळी बाजार अधिक चर्चेत आलेला आहे.

शृंगारतळी बाजारपेठेत नेहमी ग्राहकांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेने वाहनेही असतात. त्यातच मच्छी विक्रेत्या महिला रस्त्याच्या कडेने मासळी विक्रीसाठी बसलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. अनेकवेळा येथे अपघातही झालेले आहेत. त्यामुळे उघड्यावरील मासळी विक्रीवर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 18-07-2025