दापोलीतील विद्युत समस्या लवकरच मार्गी लागणार

दापोली : शहरातील वारंवार वीज खंडित होणे, धोकादायक विद्युतखांब, घरावरून जाणाऱ्या विजेच्या तारांचा धोका अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी आता ठोस पावले उचला, अशी मागणी दापोली नगराध्यक्षा कृपा घाग यांनी खेडचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांच्याकडे केली आहे.

मे महिन्यापासून दापोली उपकार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटत नसल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच तातडीने समस्या सोडवण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली. या वेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर व माजी नगरसेवक प्रकाश साळवी उपस्थित होते. दापोली परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, धोकादायक व सडलेले खांब, घरांवरील विद्युततारा, रस्त्यावरून जाणाऱ्या तारांचे स्थलांतर, मजबुतीकरणासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबरेकर यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तसेच लवकरच संबंधित दुरुस्त्या सुरू होतील, असे बाबरेकर यांनी सांगितले.

दापोली शहातील वीज खंडित होणे, धोकादायक खांब व तारा यामुळे नागरिक त्रस्त होते. दापोलीतील महावितरण कंपनीच्या अभियंत्यांकडे या आधी पाठपुरावा करून काहीच कार्यवाही होत नव्हती म्हणूनच आम्ही थेट खेडच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व लवकरच कामाला सुरुवात होईल- कृपा घाग, नगराध्यक्षा, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 18/Jul/2025