चिपळूण : खाडीपट्टा विभागातील कालुस्ते, मालदोली, भिले सोसायटींवर कारवाई

चिपळूण : तालुक्यातील भोम येथील सहकार सेवा सोसायटीत लाखोंच्या भ्रष्टाचारप्रकरणी सोसायटीच्या सचिवावर गुन्हा दाखल झाला; मात्र अद्याप हा सचिव पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या सचिवानेच कालुस्ते, मालदोली व भिले या तीन सोसायट्यांनाही अडचणीत आणले आहे. लेखापरीक्षक तसेच सहायक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या तिन्ही सोसायट्यांना भेटी दिल्या, पण तपासणीसाठी दप्तर उपलब्ध झालेले नाही. अखेर, सहकार विभागाने या तिन्ही सोसायट्यातील संचालकांना अपात्र करत संपूर्ण संचालक मंडळच बरखास्त केले आहे.

तालुक्यातील खाडीपट्टा विभागात ग्रामीण जनतेसाठी महत्वपूर्ण असलेल्या मालदोली, भोम, भिले आणि कालुस्ते या चार विविध विकास सहकारी सोसायट्यांमध्ये नियुक्त सचिवानेच सुमारे ५५ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार गतवर्षी उघडकीस आला होता. या सोसायट्यांना दिलेले लाखो रुपयांचे कर्ज थकित राहिल्यानंतर सदर सोसायट्यांची चौकशी झाली. सहायक निबंधक कार्यालयाने घेतलेल्या सुनावणीतही चारही सोसायट्यांचे दप्तर गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भोम सोसायटीचे लेखापरीक्षण झाले असता सचिवाने सुमारे १७ लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. उर्वरित कालुस्ते, मालदोली आणि भिले सोसायटीत योगेश प्रमोद भोबेकर हेच सचिव म्हणून काम करत असल्याचे सहायक निबंधकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यालयाने संबंधित सचिवाकडील दप्तर ताब्यात घेण्यासाठी गेल्या वर्षापासून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत; मात्र अद्याप त्यास यश आलेले नाही.

मालदोली येथील योगेश प्रमोद भोबेकर हे खाडीपट्ट्यातील वरील चारही सोसायट्यांमध्ये सचिव म्हणून काम करत होते. त्यांची नियुक्ती ही या सोसायट्यांनीच केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या भोबेकर यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कर्जदारांकडील थकित वसुलीची रक्कम भरणा न केल्याचे एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेला आढळून आल्यानंतर त्यांनी भोबेकर यांच्याकडे विचारणा केली. या वेळी भोबेकर याने ५५ लाखांची वसूल केलेली रक्कम आपण वैयक्तिक कारणासाठी वापरली असल्याचे लेखी कळवले होते.

त्यानंतरच लेखापरीक्षण
दप्तर उपलब्ध झाल्यानंतर लेखापरीक्षण भिले, मालदोली आणि कालुस्ते येथील तिन्ही सोसायट्यांच्या संचालकांना सहायक निबंधक कार्यालय अपात्र करत त्या बरखास्त केल्या आहेत. या तिन्ही सोसायट्यांचे दप्तर उपलब्ध झाल्यानंतरच लेखापरीक्षण होणार असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 18/Jul/2025