मंडणगड : नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिक भरपाईच्या प्रतीक्षेत

मंडणगड : मॉन्सूनच्या हंगामात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त झालेले मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिक शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. शासनस्तरावरून याकरिता निधीच न आल्याने २०२२ ते २०२४ या तीन वर्षांतील सुमारे १४ लाख रुपयांची नुकसानभरपाई निधीची प्रतीक्षा कायम आहे.

मंडणगड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ भागात येतो. तालुक्यात सरासरी चार हजार मिमी पाऊस पडतो. प्रत्येकवेळी मॉन्सूनच्या हंगामात मुसळधार वादळ पावसामुळे घरे, गोठे, दुकाने यांची पडझड झाल्याने मोठी आर्थिक हानी होते. दरवर्षी नुकसानीची सरासरी दहा ते बारा लाख रुपये इतकी आहे. मागील २०२२, २०२३, २०२४ या तीन वर्षांपासून शासनाकडून नुकसानभरपाईकरिता कोणताच निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

२०२१ ला झालेले निसर्ग चक्रीवादळ त्यानंतर आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठे स्थावर जंगम मालमत्तेचे नुकसान झाले. यात निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटातून तालुक्यातील अनेक गावे अद्याप सावरलेली नाहीत. या वादळात जंगम मालमत्तेबरोबर आंबा-काजू लागवडीचे झालेले नुकसान आजही भरून आलेले नाही. एकीकडे तीन वर्षांची नुकसान भरपाईची प्रतीक्षा असताना दुसरीकडे मे २०२५ या महिन्यात तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईपोटी ६२ हजारांचा निधी प्राप्त होऊन त्याचे वितरण झाले आहे.

तहसीलकडून पाठपुरावा सुरू
दरम्यान, तीन वर्षांपासून रेंगाळलेल्या नुकसानभरपाईबाबत तहसील कार्यालय येथे विचारणा केली असता, कार्यालयाकडून हा निधी प्राप्त व्हावा याकरिता सातत्याने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 18/Jul/2025