चिपळूण : नेपाळमधील काठमांडू येथे झालेली इंडो-नेपाळ यूथ गेम्स २०२५ मधील आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धा महाराष्ट्रासाठी गौरवाची ठरली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विशेषतः कोकण विभागातील खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदकांची लयलूट केली. चिपळूणच्या पूजा लड्ढाने दोन सुवर्णपदकांची कमाई केली तर मंथन लाड आणि रूग्वेद चव्हाण यांनी प्रत्येकी एक रौप्य आणि एक कास्यपदक पटकावले.
ही स्पर्धा ८ वर्षांपासून ते ८७वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतासह नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आदी देशांतील ५८० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. भारतीय खेळाडूंनी एकूण ९ सुवर्ण, १५ रौप्य आणि ६ कांस्यपदकांची कमाई करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. त्यात महाराष्ट्रातील योगदान ठळक राहिले.
कोकणातील योगापटू पूजा लड्डा हिने दोन सुवर्णपदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आधीही तिने पुणे येथे झालेल्या ओपन नॅशनल योगा स्पर्धेत सहभाग घेत राज्यपातळीवर यश मिळवले होते. त्यानंतर वेस्ट बंगाल आणि व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग घेत महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्या स्पर्धांमध्ये तिने दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळवले होते.
मंथन लाड आणि रूग्वेद चव्हाण या दोघांनीही अनुक्रमे एक रौप्य व एक कास्यपदक मिळवत आपली योगक्षेत्रातील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या दोघांनीही या आधी पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली होती. या खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीनंतर राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी मुंबईत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले. त्यांनी सर्व खेळाडूंना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देत त्यांचा सन्मान केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 18/Jul/2025














