रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीच्या आरक्षणामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री हे आरक्षण आले असून, याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. तसेच २०२५ अखेरपर्यंत सर्वसाधारण आरक्षण ठेवा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जयगड ग्रामपंचायतीवर २००९ ते २०१४ या कालावधीत नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सरपंच पदाचे आरक्षण होते. त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने सर्वसाधारण किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण येणे आवश्यक होते, असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी, माजी सदस्य प्रमोद प्रभाकर घाटगे, शौकत उमर डांगे, जितेंद्र रोहिदास पारकर, मंगेश कमलाकर साळवी या ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत जयगडचे २०२० ते २०२५ या कालावधीसाठीचे आरक्षण सर्वसाधारण तर याच कालावधीत २२ एप्रिल २०२५ रोजी आपल्याच अध्यक्षतेखाली सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री म्हणून २०२५ ते २०३० यासाठी आरक्षित दाखविण्यात आले होते. आता पुन्हा संपूर्ण तालुक्याचे सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करणार आहात. २०२५ अजून संपलेले नाही.
२०२५ संपेपर्यंत ग्रामपंचायत जयगडचे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण असेच ठेवावे. तसे नाही झाले, तर याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. ते फार खर्चिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण २०२० ते २०२५ हा पंचवार्षिक कालावधी पूर्ण होईपर्यंत अबाधित ठेवावे. ३१ डिसेंबर २०२५ नंतर जयगड ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली तर ती नवीन आरक्षणाप्रमाणे घेण्यात यावी. या कालावधीसाठी नामाप्रत स्त्री सरपंच पद आरक्षित करण्यात आले, तर गावातील संबंधित ग्रामस्थ असहकार्य करतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Jul/2025














