रत्नागिरी : मिऱ्या-शिरगाव नळपाणी योजनचे काम मंदावले

रत्नागिरी : जलजीवन मिशनअंतर्गत मिऱ्या, शिरगाव, निवळीतिठा व अन्य ३४ गावांसाठीच्या प्रादेशिक नळ-पाणीपुरवठा योजनेचे काम मंदावले आहे. ठेकेदाराचा झालेल्या कामाचा सुमारे ११ कोटींचा मोबदला न मिळाल्याने, टाक्यांसाठी जागा नसल्याने आणि हातखंबा ते मिऱ्यापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी महामार्गाच्या बाजूने जागा संपादन केली नसल्याने पाईपलाईन टाकायची कोठून, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेचे काम सुमारे ५६ टक्के झाले असून, ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याची मुदत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रत्नागिरी शहरासह तालुक्यातील ३४ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यासाठी ही योजना सुरू आहे. जलजीवन मिशनअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे १ लाख ८६ हजार २०५ व्यक्तींना म्हणजेच २०२२च्या लोकसंख्येनुसार प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. वळके येथे जॅकवेल व पंपगृह तळघराचे काम पूर्ण झाले आहे.

जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली असून, प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नळजोडणी व साठवण टाक्यांच्या कामांमध्येही प्रगती आहे. पानवल झोनमधील जुगाईनगर, आपकरेवाडी आणि होरंबेवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. खेडशी झोनमध्ये खेडशी-चाँदसूर्या, डफळखोलवाडी, खेडशी-भंडारवाडी येथे उंच साठवण टाक्यांचे काम सुरू आहे, तर खेडशी-महालक्ष्मी मंदिर, खेडशी-द्वारकानगर (पोमेंडी बु.) आणि खेडशी-आदिशक्तीनगर (पोमेंडी बु.) येथील छताचे काम पूर्ण झाले आहे. नावडेवाडी सिंटेक्स टाकी, रवींद्रनगर कुंभारवाडी, मिरजोळे-नवीन वसाहत आणि कुंभारवाडी येथील कामेही पूर्ण झाली आहेत. अनेक ठिकाणी टाक्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. हातखंबा ते मिऱ्या पाईपलाईन टाकण्यासाठी महामार्गाच्या बाजूने जागा संपादित केलेली नाही. त्यामुळे योजनेच्या कामात अडथळे आले आहेत.

११८.१० पैकी ७५ किमी काम पूर्ण
योजना एकूण ११८.१० किमी असून, त्यापैकी ७५ किमी काम पूर्ण झाले आहे. इतर कामांसाठी ग्रामपंचायतींचे सहकार्य अपेक्षित आहे. योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या काही ठिकाणी विशेषतः अॅप्रोच रोडवरील ग्रामपंचायतींकडून जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी टाक्यांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ते काम थांबले आहे, तर ठेकेदाराचे झालेल्या कामाचे सुमारे अकरा कोटी रुपये येणे आहे. त्यामुळे योजनेच्या कामाचा वेग मंदावला आहे.

मिऱ्या-शिरगाव प्रादेशिक नळपाणी योजनेमुळे अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे या कामाचे शासनाकडून थर्डपार्टी ऑडिट करण्यात येते. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. ठेकेदाराचे पूर्वीचे देणे, टाक्यांना मिळत नसणारी जागा, हातखंबा ते मिऱ्यापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी येणारा अडथळा आदींमुळे काम काहीसे मंदावले आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे- योगेश नांजाप्पा, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 18/Jul/2025